इस्लामपुरात यंदाचा सार्वजनिक गणेशोत्सव रद्द..!

इस्लामपूर : कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे इस्लामपूर शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव रद्द करण्यात आला आहे. बचत करून कोविड सेंटरला सहकार्य करण्याचा निर्णय सार्वजनिक गणेश मंडळाच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला. पोलिस उपाअधिक्षक कृष्णात पिंगळे, पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक झाली.

कृष्णात पिंगळे म्हणाले, शहरात मार्च महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाला होता. त्यावेळी सर्व प्रशासकीय यंत्रणा, लोकप्रतिनिधी नागरिक यांनी सामूहिक प्रयत्न करून कोरोना प्रसारास आळा घालून कोरोना मुक्तीचा इस्लामपूर पॅटर्न असा आदर्श निर्माण केला होता. सध्या शहरात नव्याने कोरोनाबाधीत रूग्ण आढळू लागले आहेत. अशा परिस्थितीत गणेशोत्सव साजरा केल्यास कोरोना संसर्गाचा धोका मोठया प्रमाणात वाढू शकतो. गणेश मंडळांनी लोकहिताचा निर्णय घेत कोविड सेंटरला मदत करावी.

नारायण देशमुख म्हणाले, इस्लामपूर शहरा नजीकच्या गावांनी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कोणत्याही मंडळांनी सार्वजनिक गणपतीची प्रतिष्ठापना न करता हा सण घरीच साजरा करून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले.

यावेळी उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, नगरसेवक संजय कोरे, राजेंद्र डांगे, विश्वनाथ डांगे, शहाजीबापू पाटील, संग्राम पाटील, वैभव पवार, शकील सय्यद, अमित ओसवाल, प्रदिप लोहार, अजित पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सार्वजनिक गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *