Unlock 4: तळीरामांची चंगळ; या राज्यातील सुरु होणार बार

लखनौ – राज्यातील बारना परवानगी देण्याचा निर्णय उत्तर प्रदेश सरकारने घेतला असून यासंबंधीचे निर्देश सर्व जिल्हा उत्पादनशुल्क अधिकारी आणि सहाय्यक उत्पादनशुल्क आयुक्तांना देण्यात आले आहेत. हे बार रात्री १० वाजेपर्यंत खुले राहतील. बारना परवानगी देण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या अनलॉक-४ गाइडलाइन अंतर्गत घेण्यात आला आहे. या गाइडलाइनचे राज्याचा उत्पादन शुल्क विभाग पालन करेल, असे अतिरिक्त मुख्य सचिव संजय आर भूसरेड्डी यांनी सांगितले.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २४ मार्चला देशभरात लॉकडाउन करण्यात आल्यापासून उत्तर प्रदेशात मद्यविक्रीच्या दुकानांसह बार बंद होते. चार मे पासून दारु आणि बिअर विक्रीची दुकाने सुरु झाली. पण बार बंदच होते. उत्तर प्रदेश सरकारने अनलॉक-४ संदर्भात गाइडलाइन जारी केली आहे. या गाइडलाइननुसार राज्यात फक्त कंटेन्मेंट झोनमध्ये ३० सप्टेंबरपर्यंत लॉकडाऊन कायम असेल. त्याशिवाय राज्य सरकारने जनतेला शनिवारच्या लॉकडाऊनमधूनही दिलासा दिला आहे. आता यापुढे शनिवारी लॉकडाऊन नसेल. सर्व दुकाने खुली राहतील. फक्त रविवारचा लॉकडाऊन कायम राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *