राज्यात दररोज लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण होत आहे. कोरोना लसीकरणामध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर असून आतापर्यंत ८० लाखांपेक्षा अधिक नागरिकांचे लसीकरण झाल्याची माहिती मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मंगळवारी दिली. राज्यात वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन लसीकरणाला अधिक वेगाने करण्याचे प्रयत्न आहेत. लसींचा अधिकाधिक पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, असे निर्देशही त्यांनी दिले. कोरोना लसीकरणासंदर्भात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्य सुकाणू समितीची बैठक झाली. यावेळी कुंटे यांनी राज्यात सुरु असलेल्या लसीकरणाचा आढावा घेतला. महाराष्ट्रात सुमारे एक कोटी सहा लाख डोसेस प्राप्त झाले असून त्यापैकी ८८ लाख डोसेसचा वापर झाला आहे. महाराष्ट्रात डोस वाया जाण्याचे प्रमाण तीन टक्के आहे. ते अत्यंत कमी असून राष्ट्रीय सरासरीच्या देखील निम्मे आहे. सोमवारपर्यत महाराष्ट्रात ८१ लाख २१ हजार ३३२ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. राज्यात दररोज ४ लाख नागरिकांचे लसीकरण केले जात आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
४५ वर्षापूढील लोकांचे लसीकरण
८० लाखाहून अधिक नागरिकांचे लसीकरण करुन महाराष्ट्राने देशात अग्रक्रमात सातत्य राखल्याबद्दल यंत्रणेचे अभिनंदन करतानाच लसीकरणाचा वेग अधिक वाढविण्याची सूचना कुंटे यांनी केली ४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाची राज्य सरासरी १२. ३ टक्के असून राज्यातील भंडारा, कोल्हापूर, नागपूर, मुंबई, पुणे, सांगली, गोंदिया, वाशिम आणि वर्धा या जिल्ह्यांनी राज्य सरासरीपेक्षा अधिक लसीकरण केले आहे. औरंगाबाद, पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, ठाणे या सहा जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या जास्त असून येथे प्राधान्याने ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी यंत्रणेने प्रयत्न करावेत. राज्यातील लसीकरणाचा वेग पाहता केंद्र शासनाकडून जास्तीचा लस पुरवठा होण्याकरीता पाठपुरावा करण्यात येईल, असे सीताराम कुंटे यांनी सांगितले.
यावेळी शालेय शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास, मदत आणि पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव ओ.पी.गुप्ता हे देखिल उपस्थित होते.