रुग्ण संख्या वाढत असतानाच आता लहान मुलांमध्ये देखील कोरोना चा प्रसार वाढतो आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पुणे शहरामध्ये लहान मुलांमध्ये पण कोरोना चा प्रसार वाढत असलेला पाहायला मिळतोय. मुलानं मधून इतरांमध्ये कोरोनाचा प्रसार होऊ शकत असल्याने ही काळजीची बाब आहे. कोरोना झाल्यानंतर मुलांना काहीच त्रास होत नसला तरी पोस्ट कोव्हिड काळात लहान मुलानं होणारा त्रास हा जीवघेणा देखील ठरू शकत असल्याचं मत तज्ञ डॉक्टर व्यक्त करत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून कोरोना पॉझिटिव्ह येणाऱ्या लहान मुलांचे प्रमाण वाढले आहे. पहिल्यापेक्षा दुसराच स्ट्रेन हा लहान मुलांसाठी जास्त घातक ठरतो आहे. मुलांना लागण होण्याचे प्रमाण नेमकं का वाढले आहे याविषयी बोलताना बालरोगतज्ञ डॉक्टर संजय ललवाणी म्हणाले,” गेल्या वेळेस पेक्षा आत्ता कोरोनाच्या प्रसाराचे प्रमाण आठ ते दहा टक्क्यांनी जास्त आहे. मागच्या एका आठवड्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये दहा हजार लोक पॉझिटिव्ह आहेत. जेव्हा इतक्या मोठ्या प्रमाणात लोक पॉझिटिव्ह होत आहे त्यावेळी सहाजिक सर्व वयोगटात कोरोनाचा प्रसार पहायला मिळतो. आमच्या उघडी मध्ये येणाऱ्या लहान बाळांमध्ये ज्यांना सर्दी खोकला झाला आहे अशा बाळांची चाचणी केल्यावर त्यातील आठ ते दहा टक्के बाळं पॉझिटिव्ह येत आहेत. ”
मुलांमध्ये नेमकी काय लक्षणे आढळतात याबाबत बोलताना ललवाणी म्हणाले ,” मुलांमध्ये नेहमी प्रमाणे सर्दी आणि खोकला होतो. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. मुलांची चाचणी करून घ्यावी. बाळांना एकटे ठेवणे शक्य नसते त्यामुळे त्यांचा बरोबर आईला देखील क्वारंटाईन करावे. आत्ता जो कोरोना चा स्ट्रेन आहे तो जास्त पसरतो. त्यामुळे घरातील इतरांना या बाळा पासून लांब ठेवणे आवश्यक आहे. लहान मुलांना कोरोना झालेला असताना इतर काही त्रास जाणवत नाही. पण प्रसार रोखण्यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. ”
दरम्यान कोरोनाबधित असताना त्रास होत नसला तरी मुलांना पोस्ट कोरोना सिम्प्टम्स गंभीर स्वरूपाचे दिसत आहेत. “जगभरात जो प्रकार दिसत होता ते लक्षण आता इथे मुलांमध्ये दिसत आहे. ते म्हणजे ज्या मुलांना कोव्हिड होऊन गेला आहे किंवा ज्यांचा घरात कोणाला कोरोना झालेला होता अशा मुलांना पोस्ट कोव्हिड हायपर इन्फ्लामेट्री सिम्प्टम दिसत आहे. त्यामधून मुलांची प्रतिकार शक्ती एका वेगळ्या स्तरावर जाऊन त्यांचा लिव्हर ला सूज येते , पुरळ येतात,जुलाब होतात. हृदयावर ताण येऊन त्यांचा जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. या लक्षणांना वेळीच ओळखून उपचार करणं गरजेचं आहे. दोन तीन महिन्यांनी हा सिम्प्टम दिसतो. त्यामुळे आता या लाटे नंतर पुढचा काळात या लक्षणांचा मुलांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे काळजी घेणं आवश्यक आहे.” असेही ललवाणी म्हणाले.