भाटघर धरण “फुल्ल’

भोर – भोर तालुक्‍यातील भाटघर धरण जलाशयात 99.5 टक्‍के पाणीसाठा झाला असून, स्वायंचलित 45 दरवाजातून पाण्याचा प्रवाह सुरू झाला आहे. पाऊस कमी झाला असल्याने धरण मध्यरात्री 12 ते 1 वाजेपर्यंत 100 टक्‍के भरेल, असा विश्‍वास धरण प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र धोपटकर यांनी व्यक्‍त केला आहे.

मागील वर्षी 4 ऑगस्टला धरण 100 टक्‍के भरले होते. धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाला असून जलाशय पातळी पूर्ण क्षमतेने वाढली असल्याने जलाशयाला साडी-चोळी, हार-नारळ अर्पण करून कार्यकारी अभियंता राजेंद्र धोपटकर यांच्या हस्ते जलाशयाचे विधिवत पूजन करण्यात आले.

यावेळी भाटघर धरण प्रकल्पाचे शाखा अभियंता अनिल नलावडे, नीरा देवघर धरण प्रकल्पाचे डेप्युटी अभियंता अशोक चव्हाण, नानासाहेब कांबळे, भोर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सारंग शेटे, सूर्यकांत किंद्रे, नितीन धारणे आणि धरण प्रकल्पाचे कर्मचारी उपस्थित होते.

भाटघर धरण हे 24 टीएमसी पाणी साठवण क्षमतेचे असून, या धरणाचे पाणी नीरा नदीतून वीर धरणात संकलित केले जाते आणि ते डाव्या उजव्या कालव्यांद्वारे पूर्वेकडील बारामती, इंदापूर, फलटण, खंडाळा आणि सोलापूरकडील शेतीसाठी पुरवले जाते.

धरणाला एकूण 81 दरवाजे (मोऱ्या) असून, यात 45 दरवाजे स्वयंचलित आहेत. भोर तालुक्‍यातील येळवंडी नदीवार हा धरण प्रकल्प ब्रिटिश राजवटीत 1913 ते 1928 या कालावधीत उभारला असून धरणाचे संपूर्ण बांधकाम चिरेबंदी दगडा व घाणीच्या चुन्यात केलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *