भारत-चीन सीमा वाद : लडाखमध्ये दोन्ही देशांच्या जवानांमध्ये झटापट – भारतीय लष्कर

29 आणि 30 ऑगस्टच्या रात्री चीनकडून भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती भारतीय लष्कराकडून देण्यात आली आहे. पेंगाँग लेक परिसरात ही घुसखोरी झाल्याचं लष्करानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. तर भारतीय सैन्यानेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचं उल्लंघन केलं असा आरोप चीनचे सरकारी वर्तमानपत्र ग्लोबल टाइम्समध्ये करण्यात आला आहे.

सध्या चुशुल इथं ब्रिगेडर कमांडर दर्जाच्या अधिकाऱ्यांची बैठक सुरू आहे.

गलवान खोऱ्यात 15 जूनला दोन्ही देशांतील सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीनंतर दोन्ही देशांमध्ये लष्करी आणि राजनयिक पातळीवर जो तोडगा काढण्यात आला होता, त्याचं उल्लंघन करण्याचा चीननं प्रयत्न केल्याचं लष्कराच्या निवेदनात म्हटलं आहे.

भारतीय सैन्याने पीआयबीच्या माध्यमातून आपलं निवेदन सादर केलं आहे.

त्यानुसार, “भारतीय सैनिकांनी पँगोंग त्सो लेक येथे चीनी सैनिकांच्या उकसवणाऱ्या हालचालींना रोखलं आहे. भारतीय सैन्य संवादाच्या माध्यमातून शांतता टिकवण्याच्या बाजूचं आहे. परंतु याबरोबरट देशाच्या अखंडतेसाठी आणि संरक्षणासाठीही कटीबद्ध आहे. या वादावर ब्रिगेड कमांड स्तरावर बैठक सुरू आहे.”

भारतीय सैन्याने दिलेल्या माहितीनुसार ही झटापट 29-30 ऑगस्टच्या रात्री झाली. पीएलए म्हणजेच पिपल्स लिबरेशन आर्मीने ‘जैसे थे’ स्थितीमध्ये करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय सैनिकांनी तसं होऊ दिलं नाही.

एलएएसी पार केल्याच्या बातम्या चीनने नाकारल्या आहेत. चीनचे सरकारी वर्तमानपत्र ग्लोबल टाइम्सनुसार चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी आपला देश प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे काटेकोरपणे पालन करतो असं म्हणाले आहेत. तसेच चीनच्या सैन्याने कधीही ही रेषा ओलांडलेली नाही, दोन्ही देश याबाबतीत एकमेकांशी संपर्कात आहेत असंही वांग यी म्हणाले आहेत.

भारत आणि चीन यांच्यामध्ये 3500 किमी लांबीची सीमा आहे. दोन्ही देशांमध्ये या सीमेच्या सध्याच्या स्थितीवर सहमती नाही. यावरुन भारत-चीन यांच्यामध्ये 1962 साली युद्धही झाले आहे.

गेल्या आठवड्यातच भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं होतं की, LAC म्हणजेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनसोबतचे संबंध हे 1962 नंतर आता पुन्हा तणावपूर्ण झाले आहेत.

“ही 1962 नंतरची निश्चितच गंभीर परिस्थिती आहे. 45 वर्षांनंतर चीनसोबत हिंसक संघर्ष झाला. सीमेवर दोन्ही बाजूंनी सैनिकांची उपस्थिती अपरिहार्य आहे.”

“आपण गेल्या तीन दशकांचा इतिहास पाहिला तर वादांचं निराकरण हे राजनयिक चर्चांच्या माध्यमातूनच झालं आहे. आम्ही अजूनही हाच प्रयत्न करत आहोत,” असंही जयशंकर यांनी म्हटलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *