“इतक्या पारदर्शक बदल्या आणि नेमणुका याआधी कधीच झाल्या नाहीत”

मुंबई | महाविकास आघाडी सरकारने बदल्यांसाठी 5 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली होती. मात्र गणेशोत्सव संपताच राज्य सरकारने बदल्यांचा आदेश काढला. यावर भाजप जोरदार टीका करत आहे. मात्र याआधी कधीच इतक्या पारदर्शक बदल्या आणि नेमणुका झाल्या नसल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून म्हटलं आहे.

गृहखात्याचा कारभार हा राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडे आहे. गृहमंत्री अनिल देशमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात अशा नेत्यांनी एकत्र बसून पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे पत्ते पिसले आहेत हे स्पष्ट दिसतं, त्यामुळे कोणत्याही कुरबुरी न होता हे बदल झाले हे महत्त्वाचं बाकी विरोधक काय बोलतात आणि टीका करतात याकडे फार लक्ष देण्याची गरज नसल्याचं संजय राऊत यांनी अग्रलेखात म्हटलं आहे.

कोविड काळात याच अधिकाऱ्यांच्या मदतीने मुख्यमंत्र्यांनी संकटाचा सामना केला. मुख्यमंत्र्यांनी प्रशासनावर विश्वास ठेवला हे महत्त्वाचे. पहिल्या महिनाभरातच त्यांना बदल्या करता आल्या असत्या, पण त्या केल्या नाहीत. आता ज्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत, त्याचा अभ्यास विरोधकांनी केला तर इतक्या पारदर्शक बदल्या आणि नेमणुका यापूर्वी कधीच झाल्या नाहीत याची खात्री त्यांना पटेल, असं म्हणत राऊत यांनी अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधला.

दरम्यान, मर्जीतले अधिकारी त्यांनी त्यांच्या काळात नेमले. आता कर्तबगारी, राज्याची गरज पाहून नेमणुका झाल्या. त्यामुळे कोणी कितीही टीका केली तरी सरकारचा व्यवहार जनतेच्या सुरक्षेशी असतो, त्याबाबत व्यवहार चोख झाला आहे असं सांगता यावं अशा प्रकारे पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत, असं राऊत यांनी अग्रलेखातून म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *