तळवडे येथील रुपीनगरमध्ये 10 ते 12 जणांच्या टोळक्याने घरात झोपलेल्या तरुणाचे शुक्रवारी रात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास अपहरण केले. त्यातील चारजण सराईत गुन्हेगार आहेत. तर अपहरण झालेला तरुणही सराईत गुन्हेगार असल्याची माहिती मिळाली आहे. सचिन उर्फ अंड्या लक्ष्मण चौधरी (वय 22, रा. रुपीनगर, तळवडे, मूळ- राजस्थान) असे अपहरण झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याचे वडील लक्ष्मण हुकमाराम चौधरी (वय 47) यांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी योगेश दिनेश सावंत (वय 22, रा. रुपीनगर), आकाश उर्फ गुंड्या प्रकाश भालेराव (रा. चिंचेचा मळा, टॉवर लाईन रोड, तळवडे), रुपेश प्रकाश आखाडे (वय 23, रा. शिवरकर चौक, त्रिवेणीनगर) आणि अन्य सात ते आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदारांचा मुलगा सचिन गुरुवारी रात्री घरी झोपला होता. शुक्रवारी मध्यरात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास आरोपी सचिनच्या घरी आले. त्यांनी सचिन याला जबरदस्तीने उचलून नेले. त्यानंतर सचिन दिवसभर घरी आला नाही, त्यामुळे तक्रारदारांनी याबाबत पोलिसात धाव घेऊन तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणी चिखली पोलीस अधिक तपास करीत आहेत.
आरोपी योगेश सावंत याच्यावर निगडी पोलीस ठाण्यात मारामारी, खुनाचा प्रयत्न असे पाच गुन्हे दाखल आहेत. आरोपी आकाश भालेराव याच्यावर निगडी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, मारामारीचे चार गुन्हे दाखल आहेत. आरोपी रुपेश आखाडे याच्यावर चिखली पोलीस ठाण्यात दरोडा आणि मारामारीचे दोन गुन्हे दाखल आहेत. तर अपहरण करण्यात आलेल्या सचिन चौधरी याच्यावरही निगडी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, मारामारीचे चार आणि चिखली पोलीस ठाण्यात दरोड्याचा एक असे पाच गुन्हे दाखल आहेत. दरोड्याच्या एका गुन्ह्यात सचिन चौधरी आणि रुपेश आखाडे एकत्र होते.