नवी दिल्ली – देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 1,29,28,574 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1,26,789 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 685 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,66,862 लोकांना जीव गमवावा लागला आहे. कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेमुळे परिस्थिती गंभीर होत आहे. याच दरम्यान निवडणूक प्रचारात राजकीय नेत्यांनी कोरोना गाईडलाईन्स मोडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या प्रकरणात दिल्ली हायकोर्टात (Delhi High Court) याचिका दाखल करण्यात आली आहे.
दिल्ली हायकोर्टाने या याचिकेवर केंद्रीय गृह मंत्रालय (Home Ministry) आणि निवडणूक आयोगाला (Election Commission) नोटीस बजावून उत्तर मागितलं आहे. 30 एप्रिलपर्यंत या नोटीशीला उत्तर देण्याचे आदेश हायकोर्टाने आता दिले आहेत. कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने नियमावली जारी केली आहे. त्याचं पालन राजकीय सभांमध्ये नेत्यांकडून होत नाही, असा दावा या याचिकेत करण्यात आला आहे.निवडणूक आयोगाने या निर्देशांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश द्यावेत यासाठी आयोगाला निर्देश देण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. 17 मार्च रोजी उत्तर प्रदेशचे माजी DGP आणि सीएसएससी या थिंक टँकचे संचालक विक्रम सिंह यांनी ही याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना दिल्ली हायकोर्टाकडून आता हे आदेश देण्यात आले आहेत.