महामूद पटेल यांचीही करोनाशी झुंज संपली; पत्नी, जावयाचा आधीच मृत्यू

सोलापूर – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महामूद इसाक पटेल (वय 60) यांची करोनाशी लढताना अखेर रविवारी दुपारी प्राणज्योत मालवली. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ शेतकऱ्यांच्या हितासाठी लढणारा लढवय्या निघून गेल्याचे दुःख शेतकऱ्यांनी व्यक्‍त केले. त्यांच्या पश्‍चात दोन मुली, दोन मुले, नातवंडं व वडील आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील कर्नाटक सीमेवरील कुरघोट येथील महामूद इसाक पटेल रहिवासी होते. सुरुवातीला ते शरद जोशी प्रणीत संघटनेचे शाखा अध्यक्ष होते. त्यानंतर शेतकऱ्यांच्या विविध समस्यांविषयी आंदोलने करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. शिवानंद दरेकरनंतर शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी महामूद पटेल यांच्यावर सोपविण्यात आली होती. सन 2014-15 नंतर आजतागायत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून ते काम करत होते. गेल्या एप्रिल महिन्याच्या 23 तारखेला महामूद पटेल, त्यांची पत्नी लैलाबी पटेल आणि जावईदेखील करोना पॉझिटिव्ह आढळले होते. सोलापुरातील एका खासगी हॉस्पिटल येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. दुर्दैवाने 27 एप्रिलला जावयाचा, तर 17 मे रोजी पत्नीचे करोनाने निधन झाले, तर रविवारी महामूद पटेल यांचे निधन झाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांचे ते कट्टर समर्थक होते. सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी त्यांनी अनेक आंदोलन केली आहेत. शेतकऱ्यांच्या उसाला हमीभाव, एफआरपी मिळवून देण्यासाठी अनेक कारखान्यांवर आंदोलन, उपोषण करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला होता. माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानासमोर तसेच धर्मराज काडादी यांच्या सिद्धेश्‍वर साखर कारखान्यासमोर महामूद पटेल यांचे झालेले आंदोलन राज्यभर चर्चेचा विषय ठरला होता. डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *