प्रणव मुखर्जींसारख्या अनुभवी, सुसंस्कृत, मार्गदर्शक नेतृत्वाचं निधन ही भारतीय राजकारणाची मोठी हानी

मुंबई | देशाचे माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे नेते प्रणव मुखर्जी यांचं आज निधन झालं. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रणव मुखर्जी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार शोक व्यक्त करत म्हणाले, ‘माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. प्रणव मुखर्जी साहेबांच्या निधनानं भारतीय राजकारणातील सर्वमान्य, सर्वसमावेशक नेतृत्वं काळाच्या पडद्याआड गेलं आहे. त्यांच्यासारख्या ज्येष्ठ, अनुभवी, विद्वान्, सुसंस्कृत, मार्गदर्शक नेतृत्वाचं निधन ही देशाची, भारतीय राजकारणाची मोठी हानी आहे.’

‘डॉ. मनमोहन सिंह यांच्यासारख्या अर्थतज्ञ पंतप्रधानांच्या काळात देशाचं अर्थमंत्रीपद यशस्वीपणे सांभाळून त्यांनी आपली क्षमता सिद्ध केली होती. महत्वाच्या मुद्यांवर देशातील राजकीय नेतृत्वामध्ये समन्वय साधून प्रश्न सोडवण्याचं कौशल्य आदरणीय प्रणवदांकडे होतं. त्यांचं निधन ही देशाची, महाराष्ट्राची, माझी व्यक्तिगत हानी आहे. देशाच्या या महान नेतृत्वाला मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.’ असंही अजित पवार म्हणालेत.

प्रणव मुखर्जी यांची प्रकृती कालपासून अधिकच ढासळली होती. फुफ्फुसातील संसर्गामुळे ते सेप्टिक शॉकमध्ये असल्याचं आज सकाळी लष्करी रुग्णालयाने सांगितलं होतं. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर दिल्लीतील लष्कराच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

आशीर्वाद घेतानाचा फोटो ट्विट करत पंतप्रधान मोदींकडून प्रणव मुखर्जींना श्रद्धांजली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *