मोदींच्या ‘मन की बात’वर डिसलाईक्सचा पाऊस का पडला?

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल मन की बातमधून देशवासीयांशी संवाद साधला. लोकलसाठी व्होकल व्हा, याचा पुनरुच्चार मोदींनी केला. खेळण्यांच्या निर्मितीत देशाला अग्रेसर होण्याची संधी आहे. त्यामुळे यासाठी स्टार्टअप्स कंपन्यांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहनही मोदींनी केलं. मात्र मोदींची ‘मन की बात’ अनेकांना पटलेली दिसत नाही. भाजपाच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवरील आकडेवारीतून ही बाब अधोरेखित झाली आहे.

पंतप्रधान मोदींनी रविवारी ‘मन की बात’मधून त्यांचे विचार मांडले. भाजपानं त्यांच्या अधिकृत यूट्यूब चॅनवरून ‘मन की बात’चा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ यूट्यूबवर अपलोड करून २४ तास झाले आहेत. सध्याच्या घडीला (३१ ऑगस्ट संध्याकाळी ७ वाजेपर्यंत) जवळपास २७ लाख जणांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. आतापर्यंत १ लाख ९ हजार लोकांनी व्हिडीओ लाईक केला. तर डिसलाईक करणाऱ्यांची संख्या ६ लाख ९४ हजार इतकी आहे. म्हणजेच डिसलाईक करणाऱ्यांचं प्रमाण नऊपट आहे. कमेंट सेक्शनमध्ये अनेकांनी मोदींच्या ‘मन की बात’बद्दल स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. या व्हिडीओवर १ लाख १७ हजार कमेंट्स आल्या आहेत. यातल्या बहुतांश कमेंट्स नकारात्मक आहेत. मात्र मोदींच्या ‘मन की बात’वर डिसलाईक्सचा पाऊस का पडला, याच ठळक कारणं ‘लोकमत’च्या संपादकीय मंडळातील अनुभवी मंडळींनी मांडलेली आहे.

‘लोकमत’च्या संपादकीय मंडळातील अनुभवी मंडळींनी मांडलेली मतं अशीः

कोरोनामुळे देशात अनेक प्रकारची संकटे उभी असताना केवळ कोरडी भाषणे ऐकण्याचा देशाचा मूड नाही, हेच मोदींच्या व्हिडीओला मिळालेल्या ‘डिसलाइक’मधून सिद्ध होतं. ढासळलेली अर्थव्यवस्था, भडकलेली महागाई, वाढती बेरोजगारी यामुळे जनता होरपळून निघाली आहे. त्यांना आता भाषणाची नव्हे कृतिशील नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळे या डिसलाईक्समधून योग्य तो संदेशपंतप्रधान कार्यालय घेईल, अशी आशा बाळगूया.
– विनायक पात्रुडकर, संपादक

कोरोनाची लस, विद्यार्थ्यांचं भविष्य घडवणाऱ्या परीक्षा, रोजगारनिर्मितीचे सरकारचे प्लॅन या अत्यंत महत्त्वपूर्ण, गंभीर आणि जनतेच्या जिव्हाळ्याच्या विषयांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी अवाक्षरही बोलले नाहीत. वास्तविक, लहान मुलांची खेळणी आणि आत्मनिर्भर भारत या विषयांना प्राधान्य देण्याच्या मनःस्थितीत नागरिक आज आहेत का?, याचा विचार त्यांनी करायला हवा. त्याचप्रमाणे, देशवासीय कोरोना संकटाने, बेरोजगारीने, आर्थिक समस्यांनी त्रस्त असताना, मोरासोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करणंही काहीसं चमत्कारिकच होतं. तेही अनेकांना रुचलेलं नाही. त्यामुळे ‘मन की बात’वर एवढे ‘डिसलाईक्स’चा आले असावेत, असं वाटतं.
– संजीव साबडे

कोरोनाच्या संकटाने देशाच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले आहे. अनलॉक झाले असले तरी सारेच काही सुरळीत झालेले नाही. दुकाने, बाजारपेठा उघडल्या आहेत खऱ्या; पण ग्राहकांच्या मनातील भीती गेलेली नाही. अशा स्थितीत भविष्याची चिंता दूर करणारे विचार किंवा भूमिका पंतप्रधान मोदी यांच्याकडून मांडली जाणे अपेक्षित होते. परंतु नेहमीप्रमाणे केवळ गोडीगुलाबीची ‘मन की बात’ त्यांनी केली, तेव्हा आता जनतेच्याही लक्षात यातील उसनेपणा आल्यानेच त्याला डिसलाइक्स अधिक मिळाले. रोजगाराचे, महागाईचे व जगण्याचेच प्रश्न समोर असताना पंतप्रधानांनी आत्मनिर्भरतेचा डोस पाजला व मुलांच्या खेळण्याचा खुळखुळा वाजवला, परंतु जनता आता दूधखुळी राहिलेली नाही. ही भाषणबाजी आता सुज्ञांना कळू लागली आहे, हाच बोध यातून घ्यायचा!
– किरण अग्रवाल, संपादक

‘मन की बात’वरील डिसलाईक्स पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी ‘आय ओपनर’ ठरू शकतात आणि त्या अर्थाने हे चित्र स्वागतार्हच म्हणता येईल. मात्र, यावरून मोदींची लोकप्रियता उतरणीस लागली असा निष्कर्ष इतक्यात काढता येणार नाही. डिसलाईक या विशिष्ट ‘मन की बात’ बाबत असू शकतो. याशिवाय सोशल मिडियावरील ट्रेंड बनविण्याचे वा फिरविण्याची तंत्रे आता भाजपाप्रमाणे विरोधी पक्षांनाही ठाऊक झाली आहेत. लोकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर, विशेषत: रोजगार, बॅंकाचे व्याज व कोरोनाचे नियंत्रण यावर मोदी बोलले असते तर अधिक चांगले झाले असते. पण यावरील ठोस उत्तरे मोदी वा त्यांच्या सल्लागारांना मिळालेली नाहीत, हेही मोदींनी ‘मन की बात’ साठी निवडलेल्या विषयावरून लक्षात येते.
– प्रशांत दीक्षित, संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *