सुशांतच्या डिप्रेशन, ड्रग्ज सेवनाबाबत रियाकडून असमाधानकारक माहिती! सीबीआयकडून चौथ्या दिवशी कसून चौकशी

– जमीर काझी
मुंबई : गेल्या चार दिवसांत ३२ तासांहून अधिक काळ केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) चौकशीला सामोरे जात असलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिने अभिनेता सुशांतसिंह याच्याशी असलेले संबंध आणि घर सोडण्यापर्यंतच्या घटना सविस्तर सांगितल्या आहेत. मात्र, तिचे ड्रग्ज कनेक्शन, सुशांतचे डिप्रेशन, त्यावरील औषधे आणि अमली पदार्थांच्या व्यसनाच्या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नांबाबत ती त्रोटक व अपुरी माहिती देत आहे. त्यामुळे तपास अधिकारी असमाधानी आहेत. त्याबाबत एनसीबीच्या अधिकाऱ्यांना कल्पना देण्यात आली असून, लवकरच तिला त्यांच्याही चौकशीला सामोरे जावे लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. सीबीआय अधिकाऱ्यांनी सलग चौथ्या दिवशी रियाकडे रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. सोमवारी तिला घेऊन अधिकाºयांनी सुशांतच्या फ्लॅटची पाहणी करीत आत्महत्येच्या अनुषंगाने माहिती घेतली. त्याचबरोबर, तिचा भाऊ शोविक, मॅनेजर सॅम्युयल मिरांडा, श्रुती मोदी, सिद्धार्थ पिठानी यांचीही कसून झाडाझडती घेतली.
सांताक्रुझ येथील डीआरडीओच्या गेस्ट हाउसमध्ये त्यांची सखोल चौकशी करण्यात येत आहे. सीबीआयने गेल्या अकरा दिवसांत सुशांतच्या मृत्यूच्या अनुषंगाने सर्व शक्यता गृहित धरून सखोल तपास केला आहे. पहिले सहा दिवस संबंधितांकडे सखोल चौकशी केल्यानंतर, मुख्य संशयित रियाकडे चौकशी सुरू केली. चौकशीत तिने सुशांतशी पहिली भेट ते लिव्ह इन रिलेशनशिप आणि ८ जूनला घर सोडेपर्यंतच्या घटना सांगितल्या. मात्र, सुशांतचा आजार, त्याबाबतचे उपचार आणि ड्रग्ज सेवनाबाबत ती स्पष्टपणे माहिती देत नसल्याचे अधिकाºयांचे ठाम मत झाले आहे. रविवारपासून तिच्यावर प्रश्नांची सरबत्ती करूनही समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने, एनसीबीच्या अधिकाºयांना त्याबाबत कल्पना देण्यात आली आहे. तेही तिची चौकशी करतील, असे सूत्रांनी सांगितले.

ईडीकडून गौरव आर्यावर आठ तास प्रश्नांचा भडिमार
सुशांत मृत्युप्रकरणात ड्रग्ज कनेक्शनच्या माध्यमातून जोडला गेलेला गोव्यातील हॉटेल व्यावसायिक गौरव आर्या याची सोमवारी सक्तवसुली संचालनालयाने आठ तासांहून अधिक काळ कसून चौकशी केली. सोमवारी अकराच्या सुमारास तो बॅलॉर्ड पियर कार्यालयात हजर झाला. चौकशीत त्याने सुशांतला आपण कधीही भेटलो नव्हतो, त्याच्याशी परिचय नव्हता, असे सांगितले. मात्र, रिया चक्रवर्तीला २०१७ पासून ओळखत होतो. एका जाहिरातीच्या शूटिंगच्या निमित्ताने तिच्याशी ओळख झाली, सांगितले आहे. तिला ड्रग पुरविण्याबाबत, तिच्याशी झालेले व्हॉट्सअ‍ॅप चॅट आणि त्याच्या मुंबईतील साथीदारांबाबत त्याच्याकडे विचारणा करण्यात येत असल्याचे अधिकाºयांनी सांगितले.

सीबीआयही करणार गौरवची चौकशी
रियाचे ड्रग्ज कनेक्शन गौरव आर्याशी असलेल्या चॅटवरून उघड झाले आहे. सोमवारी ईडीने त्याची चौकशी केल्यानंतर, आता सीबीआय आणि एनसीबी त्याची चौकशी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

रियाला शवागृहात जाण्यासाठी परवानगी दिली नव्हती – कूपर रुग्णालयाचा खुलासा
रि
याला शवागृहात जाण्यासाठी कोणतीही परवानगी देण्यात आलेली नव्हती, असा खुलासा राज्य मानवाधिकार आयोगाकडे कूपर वैद्यकीय महाविद्यालयाकडून देण्यात आला. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. पिनाक गुज्जर यांनी एका वकिलामार्फत सोमवारी सुनावणीवेळी त्याबाबतचे पत्र आयोगाला दिले. मात्र, ही माहिती प्रतिज्ञपत्राद्वारे सात सप्टेंबरपर्यंत सादर करण्याची सूचना आयोगाने केली आहे.
सुशांतच्या आत्महत्येनंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात नेण्यात आला होता. तेथे रियाने त्याचे अंत्यदर्शन घेतले होते. एका कर्मचाºयाने त्यासाठी रियाला मदत केली होती. वास्तविक, शवागृहात परवानगीशिवाय प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे तिला आत का सोडले? अशी विचारणा आयोगाने कूपर रुग्णालय आणि मुंबई पोलिसांना केली आहे. त्या नोटिशीला मुंबई पोलिसांकडून अद्याप उत्तर देण्यात आले नसल्याचे सांगण्यात आले.

सीबीआयची सुशांतच्या बहिणीकडे चौकशी
मुंबई : सुशांत राजपूतची बहीण मितू सिंह हिची सोमवारी सीबीआयच्या पथकाने चौकशी केली. त्याचे कुटुंबीयांशी असलेले संबंध आणि तिचे ८ ते १३ जून या कालावधीतील वास्तवाबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यात आल्याचे अधिकाºयांकडून सांगण्यात आले.
तिची दुसरी बहीण प्रियंका आणि तिच्या पतीकडे चौकशी करत, रिया आणि इतरांनी दिलेल्या जबाबाची पडताळणी त्यांच्याकडून केली जाणार आहे. सुशांतच्या मृत्युबाबत वेगवेगळे कंगोरे तपासात समोर येत आहेत. सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानी, त्याचे मॅनेजर, नोकर आणि रिया चक्रवर्ती व तिचा भाऊ शोविक यांच्या जबाबात काहीशी विसंगती असली, तरी सारे सुशांतने आत्महत्या केली, याबद्दल ते ठाम आहेत, तसेच सुशांतचे घरच्या मंडळीशी फारसे चांगले संबंध नव्हते, असे सांगत आहेत. तपास पथकाने आज मितू सिंहकडे त्याबाबत विचारणा केली. १४ जूनला सिद्धार्थ पिठानी याने तिला केलेले कॉल, घरी आल्यानंतरची परिस्थिती याबाबत माहिती जाणून घेतली.
सुशांतच्या मानसिक आजाराची कल्पना त्याच्या घरच्यांना होती, असे त्याचा मॅनेजर सॅम्युयल मिरांडा याचा मोबाइल रेकॉर्ड तपासल्यानंतर स्पष्ट झाले आहे. त्याने सुशांत डिप्रेशनसाठी जी औषधे घेत होता, त्याचे प्रिस्क्रिप्शन मितू आणि प्रियंका या दोघींनाही पाठविले होते, त्याबाबत तिच्याकडे सविस्तर विचारणा करण्यात आली.
घटनेची सत्यता जाणून घेण्यासाठी रिया आणि संबंधित साक्षीदारांना समोरासमोर बसवून चौकशी केली जाईल, असे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *