US Election 2020: डोनाल्ड ट्रम्प यांचं ‘गिरे तो भी…’, निवडणुकीबद्दल केला आता नवा दावा

वॉशिंग्टन, 16 नोव्हेंबर : अमेरिकन राष्ट्रपती (US Election 2020) निवडणूकीत डेमोक्रेटिक पक्षाचे जो बायडन (Joe Biden) विजयी ठरले. निवडणूकांच्या निकालानंतर आता डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पुन्हा ट्विट करत, नवा दावा केला आहे. रविवारी ट्रम्प यांनी आपली हार मान्य केली होती. पण आता त्यांनी पुन्हा नवं ट्विट करत, राष्ट्रपती निवडणूकीत स्वत: च्या विजयाचा दावा केला आहे. ‘I WON THE ELECTION!’ असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त ट्विट केलं आहे. यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी, इलेक्शन सिस्टमवरही अनेक प्रश्न उपस्थित केले होते. केवळ मीच नाही, तर इतर मोठ्या कंपन्यांनीही डेमोक्रेटिक वोटिंग सिस्टमचे निकाल स्वीकारण्यास नकार दिल्याचं, ट्रम्प यांनी म्हटलं आहे. जे आपल्या संविधानाच्या सुरक्षेसाठी आहे, त्यासोबत कोणालाही गोंधळ करण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. संपूर्ण जग हे पाहत असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय. तसंच बायडन यांनी निवडणूक जिंकली असली तरी, निवडणूकीत गोंधळ झाल्याचं सांगत त्यांनी ट्विट केलं आहे.दरम्यान, डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांनी ट्रम्प यांना टक्कर देत, अमेरिकी राष्ट्रपती निवडणूकीत मोठा विजय मिळवला. जो बायडन अमेरिकेचे 46वे राष्ट्रपती ठरले आहेत. बायडन यांना 7 कोटीहून अधिक मतं मिळाली. अमेरिकेत राष्ट्रपती पदासाठी यापूर्वी इतकी मत कधीही मिळाली नव्हती. निवडणूकीच्या निकालांनंतर, ट्रम्प यांच्याकडून सतत प्रतिक्रिया येत आहेत. या निकालांविरोधात मोठी लढाई लढणार असल्याचं सांगत, निवडणूक निकालांबाबत सुप्रीम कोर्टात जाण्याचं ते वारंवार सांगतायेत. परंतु ट्रम्प यांच्याकडे याबाबत कोणतेही पुरावे नसल्याने, ट्रम्प यांनी आपली हार मानली होती, पण आता पुन्हा ‘I WON THE ELECTION!’ म्हणत त्यांनी यूटर्न घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *